राज्यात कोरोनाच्या १८ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

राज्यात आज कोविड -१९ चे १८ हजार ४६६ नवे रुग्ण आढळले. तर, २० रुग्णांचा मृत्यू झाला. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ६६ हजार ३०८ वर गेली आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्याच्या खाली घसरला आहे. राज्यात आतापर्यंत ६७ लाख ३० हजार ४९४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ६५ लाख १८ हजार ९१६ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४१ हजार ५७३ रुग्ण दगावले. सध्या राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक १ दशांश टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे.
मुंबईत आज १० हजार ८६० नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी ८३४ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. सध्या मुंबईत उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार ४७६ वर पोचली आहे. मुंबईत आज २ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आज ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ७५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४० जण मुंबईतल आहेत. ठाणे महानगरपालिका ९, पुणे महानगरपालिका ८, पनवेल महानगरपालिका ५, नागपूर आणि कोल्हापूर प्रत्येकी ३ , पिंपरी चिंचवड २, तर भिवंडी -निजामपूर, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई प्रत्येकी एक रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण झालेल्या ६५३ रुग्णांची नोंद झाली त्यापैकी २५९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.