सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी

जिजाऊ- सावित्रीच्या लेकी…२
आपल्या सर्वांनाच माहीत असेल कदाचित नंदिनी जाधव आणि जटनिर्मूलन हे आता जणू समीकरणच झालेय..! नंदिनीताई बी.ए. MSW झाल्या. त्यानंतर बर्‍याच ठिकाणी सामाजिक कामाचे फिल्ड वर्क करताना विविध संस्थामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. गेली १० वर्ष त्या अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र चळवळीत सक्रिय आहेत. अतिशय जिद्दी, महत्वाकांक्षी, धाडसी व परिवर्तनशील असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. आपल्याला सर्व गोष्टी यायला पाहिजेत या भावनेतून सुमारे १५० प्रकारचे विविध प्रशिक्षण घेऊन त्यात वेळोवेळी नाविन्यपूर्णता त्या आणत गेल्या.
लंडन येथील सिडॅस्कोचा ब्यूटी पार्लरचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला. स्वतःची “गोल्डन ग्लोरी”संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून बरीच कामे केली.
कॅालेजमध्ये असताना कबड्डी,व्हॅालीबॅाल, अॅथलॅटिक अशा विविध खेळामध्ये त्या निपुण होत्या. पण नंतर एकाच कोणत्यातरी खेळात लक्ष देण्याचा सल्ला त्यांना मिळाला तेव्हा भालाफेक वैयक्तिक व सांघिकमध्ये व्हॅालीबॅालची त्यांनी निवड केली. भालाफेक, व्हॅालीबॅालची राष्ट्रीय खेळाडू म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

अनेक मुली व महिलांना स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले.
त्यांच्या सामाजिक कामांची यादी ही न संपणारी आहे. रेड लाईट एरिया मधील पिअर्सना ज्वेलरी मेंकींगचे प्रशिक्षण, अंध,अपंग,अनाथ आश्रम मधील मुलांना विविध क्राफ्टचे मोफत प्रशिक्षण, बॅंक ॲाफ महाराष्ट्रचे गेली दहा वर्षे महिलांसाठी विविध प्रशिक्षण देतात. तेथे फॅकल्टी म्हणून काम, दीडशे प्रकारच्या कलाकृती व ब्युटी पार्लरचे आतापर्यंत हजारो परितक्ता, विधवा महिला व मुलींना मोफत प्रशिक्षण देवून स्वत:चा रोजगार निर्माण करण्याचे प्रशिक्षण दिले.
डॅा. नरेंद्र दाभोलकरांच्या बरोबर काम करण्याची संधी एक वर्षच मिळाली. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा यासाठी आझाद मैदान वर “जेल भरो आंदोलनात”सहभाग ताईंनी घेतला. महाराष्ट्र अंनिसमध्ये डॅा. दाभोलकरांच्या खुनानंतर मात्र ताईंच्या मनावर खूप परिणाम झाला. स्रियांचे बाह्य सौंदर्य वाढविण्यापेक्षा आंतरिक विचाराचे सौंदर्य वाढविणे महत्वाचे वाटल्याने संपूर्ण पार्लर बंद करून अंनिसमध्ये पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला. दर महिन्याला लाख रूपये मिळायचे पण पैश्यापेक्षा प्रबोधन जास्त महत्वाचे वाटल्याने त्या पूर्ण वेळ समितीत कार्यरत झाल्या.
अंनिसमध्ये काम करताना विविध कलेचा ब्युटी पार्लरचा उपयोग जट निर्मूलन करण्यासाठी केला. महिलांच्या डोक्यात असणारी जट डोक्यात जट झाली की त्या विषयी असणारी देवाची व समाजाची भिती असल्यामुळे त्या जट काढण्यास तयार होत नव्हत्या. पण त्यांचे १५ दिवस ते २ वर्षापर्यंत समुपदेशन करून त्यांच्या मनातील भिती दूर करून या चार वर्षात संपूर्ण महाराष्ट्रातून रत्नागिरी,मुंबई,सातारा,सांगली,सोलापूर,ठाणे,
कोल्हापूर,पुणे या भागातील २२९ महिलांच्या डोक्यात असणारी जट निर्मूलन करुन त्यांची या अंधश्रद्धेतून मुक्तता करण्यात ताई यशस्वी झाल्या. जशी महिलांच्या डोक्यातील जट काढली जाते तसे या सर्व महिलांच्या अंगातही येणे बंद झाले आहे. जट काढल्यानंतरही सतत ताई त्यांच्या संपर्कात असतात. हे सर्व काम त्या स्वतःच्या खर्चाने करतात हे विशेष.
बुवाबाजी ,करणी,भानामती व जात पंचायत,बोगस डॅाक्टर याबाबत प्रकरणे स्वतः स्ट्रिंग ॲापरेशन करून हाताळली व आजवर अनेक केसेस दाखल केल्या. जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी नागपूर येथील आंदोलनात सलग पंधरा दिवस त्या सहभागी होत्या.
‘’जादुटोणा विरोधी कायदा”प्रचार आणि प्रसारासाठी काढलेल्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यात ४९ दिवसात २७ जिल्ह्याचा दौरा करून जादुटोणा कायद्याचा प्रचार आणि प्रसार मोहिमेत सहभागी होवून कायद्याविषयी २८० ठिकाणी व्याख्यानाचे कार्यक्रम केले.
स्त्रिया व अंधश्रध्दा, चमत्कारामागील विज्ञान, प्रात्यक्षिक सहप्रयोग व्याख्याने शाळा, कॉलेज, विविध संस्था, गणपती व नवरात्र उत्सवात तसेच स्लम एरियात ३००० हून अधिक व्याख्याने नंदिनीताईंनी दिली.अंनिस रिंगण नाटकात सहभाग घेऊन पुणे शहर शाखा ४२ व पिंपरी चिंचवड शाखा १९ ठिकाणी झालेल्या प्रयोगात ताई सहभागी झाल्या.
बार्टीबरोबरच्या प्रशिक्षण कार्यक्रमात समन्वयकाची भूमिका पार पाडली. यात १७ हून अधिक कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या त्यात महत्वाची भूमिका पार पाडली. यशदा येथे RTI चे प्रशिक्षण TOT चे प्रशिक्षक म्हणून निवड याव्दारे section 4/8 वर पुणे जिल्ह्यात विविध संस्थेत ३५ ठिकाणी प्रशिक्षण घेतले. माहिती अधिकाराचा वापर करुन यशस्वी कारवाई करण्यात यश.
सन २०१५ ते २०१७ अंधश्रद्धा निर्मूलन पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली.२०१७ ते २०१९ या वर्षासाठी परत यापदावर फेर निवड झाली. ताई झपाटल्याप्रमाणे काम करत आहेत. पुणे जिल्ह्यात सात शाखा होत्या. त्या त्यांनी २१ शाखा केल्या. वर्षभरात तीस करण्यासाठी सतत विविध ठिकाणी भेटी देवून गांव तिथे शाखा करण्याचे आहे. त्यासाठी प्रयत्न केले. जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढविणे. तसेच महिलांना सक्षम करणे हाच हेतू ठेवून अंनिसचे काम कसे वाढेल यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
सामाजिक बहिष्कृत कायदा झाल्यानंतर समाजातील जातीतून बहिष्कृत लोकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या बाजूने खंबीर उभे राहून पुणे जिल्ह्यातील बहिष्कृत कुटुंबाना बरोबर घेवून ७ जातपंचायतीच्या केसेस दाखल केल्या.
कंजारभाट समाजात होत असलेल्या कौमार्य परीक्षेविरोधात कंजारभाट समाजातील तरूणांचे प्रबोधन करून त्याचे संघटन करून त्यांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहून त्यांना मार्गदर्शन करुन समाजात होणाऱ्या अनिष्ट, रूढी परंपरेनुसार चालू असलेल्या लग्नानंतर होणाऱ्या मुलीची कौमार्य चाचणी ही प्रथा बंद होण्यासाठी लढा उभारला.
होळकर पुलाखाली म्हसोबा मंदिराच्या परिसरांत व सातारा येथील मांढरा देवीच्या मंदिरातील परिसरातील असलेल्या झाडांना करणीच्या नावाने खिळे व दाभणाच्या साहाय्याने काळ्या बाहुल्या ठोकलेल्या काढण्यासाठी पुढाकार घेवून जवळजवळ तीन पोती काळ्या बाहुल्या काढून अंनिसच्या कार्यकर्त्याना व पोलिसांना बरोबर घेवून काढून जाळून टाकल्या. पाटस तसेच यवत या भागातील चार मुलींचे बालविवाह लोकांचे प्रबोधन करून थांबवण्यात यश मिळवले. शोषण तसेच फसवणूक झालेल्या महिलांना समुपदेशन करुन त्यांना मानसिक दृष्ट्या खंबीर बनवून त्यांना पुढे आणून झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे धैर्य देवून केसेस दाखल करण्यासाठी पाठबळ देवून आतापर्यंत “पोस्को” अंतर्गत तसेच “सामाजिक बहिष्कृत कायदा” , “जादुटोणा विरोधी कायद्या” अंतर्गत ३७ केसेस दाखल करण्यात आल्या.
“सत्यमेव जयते”वाँटर कप स्पर्धेत सहभागी झालेले पुणे जिल्हा, ता. सासवड, उदाची वाडी या गावात ५२ दिवस स्वतः श्रमदान करून गावातील लोकांचे संघटन करुन काम वाढवले.या वर्षीचा “सत्यमेव जयते वॅाटर कप”स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्यामध्ये महत्वाचा वाटा.
लग्नात होणारा विनाकारण खर्च टाळून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशोधक विवाह पध्दतीचे महत्व सांगून लोकांचे मतपरिवर्तन करून आतापर्यत ६ सत्यशोधक विवाह लावण्यात ताई यशस्वी झाल्या आहेत.
गतवर्षी झालेल्या कोरोना काळात ताई झंझावाताप्रमाणे काम करत होत्या. मग ते कुत्र्यांना खाणे देणे असो किंवा रेड लाईट एरियातील महिलांना किराणा पोहोचवणे असो. ताई सतत आपल्या बुलेटवर फिरत होत्या. भयंकर काम केले ताईंनी आणि एक दिवस त्यांना कोरोनाने गाठलेच. सर्वांच्या सदिच्छा व डॅाक्टरांच्या प्रयत्नाने ताईंचा पुनर्जन्म झाला.
आजवर त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कामासाठी त्यांना आतापर्यत अनेक नामांकित अशा ६७ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पण ताईंचे पाय जमीनीवर आहेत.
अशा आपल्या सर्वांच्या फेसबुक फ्रेंड असलेल्या व महाराष्ट्रात कुठेही जटनिर्मूलनासाठी आपल्या बुलेटवर फिरणाऱ्या या जिजाऊ-सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!

Leave a Reply

Your email address will not be published.